N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

आंबेडकरांच्या हिंदुत्वाच्या दिशेने येणाऱ्या दिंडीयात्रेचे स्वागतच: शिवसेना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: अॅड. यांच्या नेतृत्वात पंढरपुरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनावर शिवसेनेने भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरच्या मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेतले. कपाळास बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल, असं शिवसेनेने म्हटलं आहे. सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे. इतके असूनही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला, असा टोला शिवसेनेने आंबेडकरांना लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून हा टोला लगावला आहे. अग्रलेखातील मुद्दे... >> मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अ‍ॅड. आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात व शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही. >> महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठाई माऊली आहे. जनतेचा, सरकारचा माऊलीशी थेट संबंध आहे. त्यामुळे जे लोक आज मंदिरात घुसण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. जगात भांडल्यावाचून काही मिळत नाही. परमेश्वराशीदेखील भक्ताला भांडावे लागले; पण इथे सरकारविरोधी पुढारीच मंदिराबाहेर उभे राहून भक्तांना भांडण्याचे उत्तेजन देत आहेत. >> मंदिरे उघडणार नाहीत किंवा मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाणार नाही असे कधीच कोणी जाहीर केलेले नाही. मंदिरे उघडण्याची ही वेळ नाही इतकेच सरकारने सांगितले. यावर वारकरी संप्रदायाचे प्रमुख लोक थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतात. अ‍ॅड. आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला भाजप नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. हे त्रांगडे कधी सुटेल असे वाटत नाही. >> गर्दीतील एकमेकांच्या संपर्कामुळे करोना होतो हा गैरसमज यानिमित्ताने संपवायचा आहे असे पंढरपुरात सांगण्यात आले. असे सांगणे म्हणजे संपूर्ण डॉक्टरी क्षेत्राला व जागतिक आरोग्य संघटनेलाच आव्हान आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील बहुजन वंचित आघाडीचे नेतृत्व ते करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांतही बौद्ध प्रार्थनास्थळांत लोकांना प्रवेश नाही अशी स्थिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना जनतेचे प्रश्न समजतात व वारे कोणत्या दिशेला वाहतात हेसुद्धा समजते. मंदिरे उघडा ही लोकभावनाच आहे हे जसे अ‍ॅड. आंबेडकरांना समजते तसे सरकारलाही समजत असावे व कोणतेही सरकार लोकभावनेला चिरडू शकत नाही. तरीही विरोधक बेबंद वागतात तसे सरकारला वागता येत नाही. सरकारच्या मनात करोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे.

https://ift.tt/3fau8np
September 01, 2020 at 08:08AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा