N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

लोकांची सटकली! पोलिसांसमोरच उद्ध्वस्त केला कंटेनमेंट झोन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
सांगली: अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी केलेल्या नागरिकांपैकी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी शहरातील इंदिरानगर परिसर सील केला होता. मात्र, संपूर्ण इंदिरानगर सील झाल्याने नागरिकांनी याला जोरदार विरोध केला. शनिवारी दुपारी संतप्त नागरिकांनी बॅरिकेट्स आणि पत्रे काढून कंटेनमेंट झोन उद्ध्वस्त केला. याशिवाय वैद्यकीय तपासणीलाही नागरिकांकडून विरोध सुरू आहे. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. हेही वाचा: जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जास्तीतजास्त नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. शुक्रवारी दुपारी अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत शहरातील इंदिरानगर परिसरातील २३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने महानगरपालिका प्रशासनाने तातडीने इंदिरानगर सील करण्याचा निर्णय घेतला. यानुसार शुक्रवारी सायंकाळी इंदिरानगरमध्ये जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेट्स आणि पत्रे लावले. या परिसरातील नागरिकांना बाहेर जाण्यासाठी निर्बंध घातले. संपूर्ण इंदिरानगर सील झाल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी कंटेनमेंट झोन उद्ध्वस्त केला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स उखडून टाकले. विशेष म्हणजे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोरच हे कृत्य सुरू होते. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. संपूर्ण इंदिरानगर सील करण्याऐवजी ज्या गल्लीत रुग्ण आढळले आहेत तेवढीच गल्ली सील करावी, असा या परिसरातील नागरिकांचा आग्रह आहे. एकाच वेळी २३ रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. मात्र, अनेकांना करोना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. यामुळे नागरिकांकडून वैद्यकीय तपासणीला विरोध सुरू आहे. करोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांकडून कंटेनमेंट झोनला विरोध झाल्याने जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने इंदिरानगरमध्ये धाव घेऊन नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. संसर्ग आणखी वाढू नये यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून केले जात आहे. हेही वाचा:

https://ift.tt/3fau8np
July 25, 2020 at 02:33PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा