N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार वेताळनगर, चिंचवड येथे घडला. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रात्री अकरा वाजता हा प्रकार घडला असून, एकाला अटक, तर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. प्रत्येकवेळी त्याची कारणे वेगवेगळी असतात. वर्चस्वाची लढाई, पूर्ववैमनस्यातून हे प्रकार घडले आहेत. तर कधी दारूच्या नशेतही वाहनांची तोडफोड किंवा जाळपोळ झाली आहे. मात्र, मंगळवारी घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. चिंचवडच्या वेताळनगरमधील एका तरुणीचे शेजारच्याच तरुणाशी प्रेमसंबंध होते. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) या दोघांनी एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला. ही बाब परिसरात समजली. या तरुणीचा अल्पवयीन भाऊ मात्र यामुळे चांगलाच संतापला. तो यामुळे काहीतरी अनुचित प्रकार करू शकतो याची कुणकुण परिसरातील नागरिकांना होती. रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा सर्व नागरिक बाहेर आले. तर प्रेम विवाह केलेल्या बहिणीचा भाऊ टोळक्यासह धिंगाणा घालत असल्याचे नागरिकांना दिसले. हातात तलवार आणि कोयते नाचवत या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड सुरू केली. दिसेल त्या वाहनांवर हे टोळके तलवारी आणि कोयत्यांनी वार करत होते. यामुळे तेथील नऊ रिक्षा, तीनचाकी मिनी टेम्पो आणि दुचाकी अशा बारा वाहनांची टोळक्याने तोडफोड केली. डोळ्यासमोर वाहनांची तोडफोड होत असल्याने नागरिकांनी परिसरात गर्दी करून या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलासह टोळक्याने तलवार आणि कोयते हातात नाचवून सर्वांना धमकावून घरात जा नाहीतर कोणाचीच खैर नाही, अशी धमकी देत दहशत माजवली. काही वेळाने टोळके तेथून पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. आतापर्यंत चिंचवड पोलिसांनी एकाला अटक करून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

https://ift.tt/3fau8np
October 28, 2020 at 01:19PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा