आजचा पदार्थ आवर्जून करून पाहा; सुक्यामेव्याचे दिंडे
‘हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला..’ आजपासून श्रावण सुरू होत आहे! श्रावण म्हणजे सणवार, व्रतवैकल्यांचा महिना. श्रावणातला पहिला सण म्हणजे ‘नागपंचमी’. पूर्वी या सणाला सासुरवाशिणी माहेरी येत. घरांघरातून या मुली लाह्या-फुटणे गोळा करून नदीकिनारी बांधलेल्या झोपळ्यांवर झोका घेत. लोकगीतांवर फेर धरत. या सर्व आठवणी सांगताना अनेक गावांतील आजींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद मी पाहिला आहे. आजकाल मात्र या गोष्टी लोप पावत चालल्या असल्या तरी या सणाचे खास, पारंपरिक पदार्थ आजही अनेक ठिकाणी होतात, हे विशेष. कानवले, पुरणाचे दिंडे, चौपुले, वगैरे. आजचा ‘सुक्यामेव्याचे दिंडे’ हा प्रकार मला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका गावात मिळाला. याला तिथे ‘गोड फळं’ असे म्हणतात.
सुक्यामेव्याचे प्रमाणात सेवन शरीरासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर असते. सुकामेवा म्हणजेच बदाम, काजू, अक्रोड, खारीक, पिस्ता होय. त्यामध्ये प्रथिने, प्रतिजैविके, मोनो-अनसॅच्यूरेटेड फॅटस्, फायबर, ओमेगा-३, कॅल्शिअम आदी महत्त्वाचे घटक असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, ऊर्जा मिळते, हाडे व स्नायू बळकट होतात. तसेच केस, त्वचेचा पोत सुधारतो. मात्र अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आजचा पदार्थ आवर्जून करून पाहा, मात्र प्रमाणात खा.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
साहित्य – सारणासाठी – आवडीप्रमाणे सुकामेवा, भाजलेली खसखस, सुक्या खोबऱ्याचा कीस, गुळ, सुंठ, काळीमिरी, बडीशेप, वेलची, जायफळ. पारी- कणीक.
कृती –
१. खोबरे, बडीशेप, मिरे भाजून घेणे. त्यात किसलेला गुळ व सुक्यामेव्याचे बारीक काप व उर्वरित साहित्य एकत्रित करून सारण बनवून घ्या.
२. पारीसाठी नेहमीपेक्षा थोडी सैल कणीक भिजवणे. पातळ पारी लाटून त्यात मध्यभागी सारण भरून चार बाजूंनी घडी मारून चौकोनी आकार देणे. (पारीच्या चारही कडा मध्यभागी सारणावर येतील.) पुन्हा एक पारी लाटून त्यात सुकामेवा भरलेला दिंडा घालून चौकोनी आकारात बंद करणे.
३. तयार दिंडे मोदकाप्रमाणे वाफवून तुपासोबत खावेत.
टीप - सुक्यामेव्याचे प्रमाण कमी ठेवून बाकी घटक अधिक ठेवल्यास हे दिंडे सर्दी व खोकल्यासाठी उपयुक्त आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा