मागील वर्षी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्राद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संदेश दिला आहे. 'हा दिन महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही. आपण जे काही आहोत, त्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात धैर्याने साथ सोबत करणाऱ्या शक्तीला वंदन करण्याचा दिन आहे. महाराष्ट्राला शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेकांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावे लागेल, त्यांना या निमित्ताने वंदन करावे लागेल. पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील महिलांनाही वंदन करावे लागेल,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
'गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढा सुरू आहे. तो अजूनही संपलेला नाही. या लढ्यात घराघरात महिलांनी न डगमगता, सगळ्यांना आधार दिला. कोविड योद्धा म्हणूनही आशा सेविका, परिचारिका अशा विविध जबाबदाऱ्या धैर्याने पार पाडल्या. त्यांचे हे योगदान इतिहास विसरू शकणार नाही. अशा कठीण काळात धैर्याने जबाबदारी घेणाऱ्या स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला जपणे, त्यांना सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. महिलांच्या दृष्टीकोनातून विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध होऊ या,' असं आवाहनही त्यांनी केलं.